त्याच्या बाप दाद्याची नव्हती अशी काही दौलत ..
अन् त्याच्या जातीलाही ती मिळत नव्हती सवलत !
शिकत नव्हता शाळेत फार भाकरीची वण वण ..
अंगावर ठिगळचं नुसते .....लाज धरी त्याच मन !
शाळा सुटली ,पाटी फुटली , जगायच होत आयुष्य ...
दुष्काळलेलाच होता वर्तमान तसच राहील भविष्य !
स्वप्न एकही रंगल नाही कितीही त्यानं रंगवलं ...
नियतीनं पुन्हा पुन्हा आभाळ त्याचं पांगवलं !
सोडवला तरी होत होता पुन्हा नुसता गुंताच ...
जगत होता तो कसतरी घेऊनी चिंता खंताच !
पैसा मिळवण्यात त्याला काहीच यश आलं नाही ...
दारिद्र्य सुटलं नाही श्रीमंतीनं त्याला वशच केल नाही !
हळहळत ,तळमळत,धडधडत , राहीला त्याचा प्राण ...
डहाळून टाकल्या बाभळी तरी होत गेल बाभूळरान !
"तसाच तो होता एक शेतकर्याच्या जातीतला -
झालाच ना आभाळाचा आता नुरालाही मातीतला !!"
--उषातनय
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा