जांभळी पिकल्या सये
वर नभी डोईवर
आनंदान मन माझं
होई कावरं बावरं !!
घोंगावतो झेपावतो
सोसाटून बाई वारा
जांभळाच्या आल्या कशा
गार बिलोरी त्या गारा !
झेलायला जांभळ ही
सये पदर तू धर !!
वाट वाट ही जांभळी
जांभळ्या ह्या दिनराती
जांभळी झाली फूल
अन् गवताची पाती !
विहीरही जांभूळली
झाली मधाळ वावर !!
पुरी जांभळाची झाली
सये मातीचीया कूस
गोड़ गोड़ साखरीचा
कसा फुललेला ऊस!
जांभळ ही चाखताना
डूले काटाळी बाभूळ !
आनंदान मन आता
माझं जांभूळ जांभूळ ! !
--उषातनय
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा